बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ७२ वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना वरखेड येथे रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी अंबादास रामराव चिंधोले यांनी अमडापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भास्कर नामदेव चौथे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अंबादास चिंधोले हे त्यांचा मुलगा दत्तात्रय याच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी भास्कर नामदेव चौथे तेथे आला आणि दत्तात्रय याला शिवीगाळ करू लागला. तसेच त्याच्या खांद्याला धक्का दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, हा प्रकार पाहून अंबादास चिंधोले हे भांडण सोडविण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी भास्कर चौथे याने हातातील दगड अंबादास यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि कपाळाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. याशिवाय आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
घटनेच्या वेळी देवीदास नामदेव चौथे यांच्यासह गावातील काही नागरिक उपस्थित असल्याचे तक्रारदाराने सांगितले. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.












