Advertisement Advertisement

बाबा आजारी आहेत’ म्हणत कॉलेजमधून निघाली; पुढं थेट ‘मी लग्न केलं’चा मेसेज… दिक्षाच्या प्रकरणाने उडाली खळबळ….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली २० वर्षीय युवती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. युवतीचे अज्ञात कारणासाठी अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दसरखेड, ता. मलकापूर येथील विनोद सोपान एकडे यांनी १८ सप्टेंबर रोजी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची पुतणी दिक्षा राजू एकडे (वय २० वर्षे) ही १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता कोलते इंजिनिअरिंग कॉलेज, मलकापूर येथे जाण्यासाठी घरातून निघाली होती. कॉलेज सुटल्यानंतरही ती सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद येत होता.

यानंतर नातेवाईकांनी कॉलेजमध्ये चौकशी केली असता, दिक्षा ही दुपारी सुमारे १ वाजता वडील आजारी असल्याचे सांगून कॉलेजमधून निघून गेल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी तिचा विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. दरम्यान, दिक्षाने तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर ‘मी लग्न केले आहे, मी सुखरूप आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी खुश आहे,’ असा संदेश पाठविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी दिक्षाने तिच्या मावशीला फोन केला. यावेळी ती रडत असल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने फोन बंद झाल्यानंतर तिच्या व्हॉट्सॲप प्रोफाइलवरील फोटो/स्टेटस तपासण्यात आले. त्यामध्ये दिक्षा आणि अक्षय विठ्ठल चिकटे (रा. वडोदा, ता. मलकापूर) यांचा फोटो असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दिक्षाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करीत तिचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली.

या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अक्षय विठ्ठल चिकटे याच्याविरुद्ध अप. क्र. ६९५/२०२६, कलम १४०(३) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!