देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या जालन्यातील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागोराव सुंदराव घोरपडे (वय ३२, रा. हनुमान घाट, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागोराव घोरपडे हे २ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास एमएच-२८-सीयू-६५८५ क्रमांकाच्या दुचाकीने बसस्थानक चौकाकडे जात होते. याचवेळी बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एमएच-१३-सीयू-७४६४ क्रमांकाच्या बसने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात घोरपडे हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बसचालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी मृत नागोराव घोरपडे यांच्या पत्नी शोभा नागोराव घोरपडे यांनी दिलेली तक्रार तसेच वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी १७ सप्टेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणे वाहन चालविणे तसेच निष्काळजी कृत्यामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी बसचालकाविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.













