Advertisement Advertisement

मोटार सुरू करायला गेला अन् काळानं घात केला! विजेचा झटका बसून २७ वर्षांच्या बादलचा दुर्दैवी मृत्यू…

आसलगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा जोरदार धक्का बसल्याने २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे घडली. बादल जगदेव अंभोरे (वय २७, रा. पळशी सुपो) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बादल अंभोरे हे घराजवळील सार्वजनिक विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी घरातून विद्युत वायर घेऊन गेले होते. विहिरीवरील विद्युत बोर्डाच्या प्लगमध्ये वायर जोडत असताना अचानक त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे ते बोर्डापासून दूर फेकले गेले.

घटना लक्षात येताच त्यांच्या आईसह गावातील नागरिकांनी तातडीने बादल यांना ऑटो रिक्षातून ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पळशी सुपो गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी सुरेंद्र सिद्धार्थ अंभोरे यांनी दिलेल्या माहितीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!