Advertisement Advertisement

पाऊस गायब, पिकं सुकली अन् सातबाऱ्यावर पीकपेराच नाही! ई-पीक पाहणीच्या घोळात शेतकऱ्यांची मदत अडकणार का?

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पावसाची अनियमितता आणि प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असतानाच दुसरबीड मंडळातील अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने सातबाऱ्यावर पीकपेरा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात शासनाकडून मिळणारी पीकनुकसान भरपाई किंवा दुष्काळी मदत मिळणार कशी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दुसरबीड परिसरात पाण्याअभावी सोयाबीनसह विविध खरीप पिके सुकू लागली आहेत. काही भागांत तर पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशाही मावळली असून, शेतीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत संभाव्य पीकनुकसान आणि दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्याच्या हालचाली सुरू असताना सातबाऱ्यावर प्रत्यक्ष पिकाची नोंदच नसेल, तर नुकसानभरपाईच्या वेळी शेतकऱ्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पीकपेरा नोंदविण्यासाठी परिसरातील शेतकरी तलाठी तसेच मंडळ अधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. मात्र, ई-पीक पाहणी कधी पूर्ण होणार, प्रत्यक्ष शेतातील पिकांची नोंद कोण करणार आणि नोंद न झाल्यास शासकीय मदतीसाठी कोणती प्रक्रिया असेल, याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी सुरेश खंदारे यांनीही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली; मात्र त्यांना स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन दुसरबीड मंडळातील प्रलंबित ई-पीक पाहणी त्वरित पूर्ण करावी, सातबाऱ्यावर प्रत्यक्ष शेतातील पिकांची अचूक नोंद करावी आणि पात्र शेतकरी केवळ पीक नोंदणीच्या अभावामुळे शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची प्रशासनाने खात्री करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!