Advertisement Advertisement

पोळ्याच्या दिवशी बैल समोरून नेण्यावरून तुफान राडा; दोन गटांत हाणामारी, ८ ते १० जण जखमी….

संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील शेवगा गावात पोळ्याच्या दिवशी बैल समोरून नेण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या हाणामारीत तब्बल ८ ते १० जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शेगाव येथे रेफर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बैल समोरून नेण्यावरून वादाचा भडका….

मारोड गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या शेवगा गावाची लोकसंख्या सुमारे ७०० आहे. पोळ्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास बैल समोरून नेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही बाजूंच्या काही जणांना दुखापत झाली.

८ ते १० जण जखमी; दोघे गंभीर….

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटलांनी तामगाव पोलिसांना याबाबत कळविले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी शेगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

तामगाव पोलिसांत अद्याप फिर्याद नाही…

वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल झालेली नव्हती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हाणामारीचे नेमके मूळ कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, गावातील परिस्थिती लक्षात घेता शेवगा ग्रामस्थांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!