बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आगामी गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांकडून महाप्रसाद आणि भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने भाविकांना अन्नाचे वितरण केले जाते. मात्र, महाप्रसादातून अन्नविषबाधा अथवा अन्य आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत, यासाठी गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्यातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाप्रसादासाठी आधी परवानगी घ्या!
महाप्रसाद किंवा भंडारा आयोजित करण्यापूर्वी गणेश मंडळांनी Complaints.mahafda.in या पोर्टलवर ‘उत्सव परवानगी अर्ज’ या सदरातून स्वतः अर्ज करणे आवश्यक आहे. मंडळाकडून स्वतः अन्न तयार केले जाणार असल्यास FSSAI पोर्टलवर नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे उत्सवाच्या तयारीसोबतच अन्न सुरक्षा नियमांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कच्चा माल घेताना पाकिटावरील माहिती तपासा….
महाप्रसादासाठी लागणारे तेल, तूप, रवा, मैदा, साखर, मसाले, भाज्या, ड्रायफ्रूट्स यासह सर्व कच्चा माल अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा. खरेदीची बिले जतन करून ठेवावीत. पॅकेटबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना उत्पादक तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, उत्पादकाचा पत्ता, घटकांची माहिती तसेच FSSAI परवाना किंवा नोंदणी क्रमांक तपासावा. स्वयंपाकासाठी कॅटरर्सची नियुक्ती केल्यास संबंधित कॅटरर्सकडे वैध अन्न परवाना असल्याची खात्री करून घ्यावी आणि केवळ परवानाधारक कॅटरर्सकडूनच महाप्रसाद तयार करून घ्यावा. तसेच स्वयंपाक करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी झालेली असून त्यांचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे की नाही, हेही मंडळांनी तपासावे.
स्वच्छ जागा अन् सुरक्षित पाणी वापरणे गरजेचे….
महाप्रसाद तयार करण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागेची निवड करावी. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेली असावीत. अन्न तयार करण्यासाठी सुरक्षित पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा. बोअरवेलचे पाणी वापरणार असल्यास त्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थ ताजे आणून शक्य तितक्या लवकर वापरावेत. तयार केलेले प्रसादाचे अन्नपदार्थ १२ तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
खाद्यरंग, रसायने आणि तेलाच्या पुनर्वापराबाबत सावधगिरी…
महाप्रसाद तयार करताना परवानगी नसलेल्या खाद्यरंगांचा वापर करू नये. अखाद्य घटक अथवा औद्योगिक रसायनांचा वापर करणे टाळावे. खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर करू नये. वापरलेल्या तेलामध्ये ‘टोटल पोलार कंपाऊंड’चे प्रमाण २५ पेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भक्तीच्या उत्सवात भाविकांच्या आरोग्याचीही काळजी घ्या!
गौरी-गणेशोत्सव भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करताना भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे महाप्रसाद किंवा भंडाऱ्याचे आयोजन करणाऱ्या सर्व गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














