तुझ्या माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये…..! हुंड्याच्या त्रासा मुळे विवाहितेने संपवली जीवनयात्रा; पतीसह ७ जणांवर गुन्हा

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): हुंड्यासाठी सातत्याने होत असलेला छळ, तसेच पतीचे कथित विवाहबाह्य संबंध यामुळे त्रस्त झालेल्या २९ वर्षीय विवाहितेने लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी पतीसह सासरच्या एकूण सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चांगलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला येथील रहिवासी रामदास भगवान डवले यांची मुलगी भारती विशाल पाऊलझगडे (वय २९) हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी निमगाव येथील विशाल पाऊलझगडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, नंतर पती व सासरच्या मंडळींकडून तिचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला.


तुझ्या माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिच्यावर वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. ही रक्कम आणणे शक्य नसल्याने तिचा छळ वाढत गेला. तक्रारीनुसार, हा त्रास ऑगस्ट २०२१ पासून १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सातत्याने सुरू होता.


याशिवाय, पती विशाल याचे श्रद्धा नामक महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावरून तो दारूच्या नशेत घरी येऊन भारतीला मारहाण करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हुंड्यासाठीचा छळ आणि कौटुंबिक तणावामुळे भारतीने अखेर टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिचे वडील रामदास डवले यांनी केला आहे.


याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी पती विशाल पाऊलझगडे, सासरे रामदास पाऊलझगडे, सासू रत्नप्रभा पाऊलझगडे, दीर वैभव पाऊलझगडे, नणंद अनिता जयसिंगपुरे, सुनिता मनसुटे आणि श्रद्धा पाचपोर यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत असून, या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!