चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील तारेच्या शेडमध्ये बांधून ठेवलेले तब्बल तीन बोकड चोरून पसार झालेल्या टोळीचा चिखली पोलिसांनी काही दिवसांतच छडा लावला आहे. या प्रकरणात चिखली पोलिसांनी जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. चोरीला गेलेल्या बोकडांची एकूण किंमत सुमारे २४ हजार ५०० रुपये आहे.
चिखली तालुक्यातील भोगावती येथील रहिवासी विशाल शिवाजी लोखंडे (वय ३१) यांनी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतातील तारेच्या शेडमध्ये शेळ्या-बोकड बांधले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास शेडवर गेले असता त्यांना शेडमधील दोन बोकड गायब असल्याचे दिसून आले.
यामध्ये सुमारे ७ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा बोकड आणि ९ हजार ५०० रुपये किमतीचा काळ्या-पांढऱ्या रंगाचा बोकड चोरीला गेला होता. तसेच शेजारीच असलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या शेडमधील सुमारे ८ हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा बोकड देखील गायब असल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारे एकूण २४ हजार ५०० रुपये किमतीचे तीन बोकड चोरट्यांनी लंपास केले.
बोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या भावाने परिसरात तसेच खासगाव येथील आठवडी बाजारात बोकडांचा शोध सुरू केला. यावेळी फिर्यादीला त्यांचा पांढऱ्या रंगाचा बोकड एका व्यापाऱ्याकडे आढळून आला. त्याबाबत व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता, सदर बोकड आदिल चौधरी, तस्लीम नवरंगी आणि गोलू चौधरी यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे बोकड चोरीच्या प्रकरणात संबंधित आरोपींचा सहभाग असल्याचा संशय बळावल्याने विशाल लोखंडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका जनार्दन इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला.
गुप्त माहिती मिळताच पोलिसांचे पथक जालन्यात दाखल….
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी डी.बी. पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी जालना जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर तपास अधिकारी पोहेका जनार्दन इंगळे, पोका अमोल गवई, पोका निलेश सावळे आणि पोका विशाल वायाळ यांच्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशाने तात्काळ जालना जिल्हा गाठला.
पोलिसांनी जालना तालुक्यातील राममुर्ती गावातून दोन आरोपींना, तर जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका आरोपीला, अशा एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना चिखली पोलीस ठाण्यात आणून या बोकड चोरीच्या गुन्ह्यात अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई….
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पोउपनि शरद भागवतकर, मपोउपनि अश्विनी गाडे, पोहेका जनार्दन इंगळे, पोका विशाल वायाळ, तसेच डी.बी. पथकातील पोहेका अमोल गवई व पोका निलेश सावळे यांनी सहभाग घेतला.














