Advertisement Advertisement

पांगरी काटे शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ! सात शेतकऱ्यांच्या शेतात घुसून स्प्रिंकलरच्या तब्बल १०० तोट्या पळवल्या; ३० हजारांचा फटका….

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पांगरी काटे शिवारात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर संचावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. ३० ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल सात शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर संचाच्या सुमारे १०० तोट्या चोरून नेल्या. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकरी उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्यासाठी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत शेतात स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याचे काम सुरू असतानाच चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तोट्यांवर हात साफ केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण काटे, नारायण गवई, मदन गवई, सतीश जाधव आणि भास्कर काटे यांच्यासह सात शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर संचाच्या तोट्या चोरीला गेल्या आहेत. यातील नारायण गवई आणि बाळकृष्ण काटे यांच्या शेतातील गोठ्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत ठेवलेल्या तोट्या लंपास केल्या. तर इतर शेतकऱ्यांच्या शेतात पाईपलाईनवर बसविलेल्या स्प्रिंकलरच्या तोट्या काढून चोरट्यांनी पोबारा केला.

चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्याला लक्ष्य केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची मागणीही शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!