नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातल्या धानोरा खुर्द गावातून एक १८ वर्षांची पोरी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
धानोरा खुर्द येथील गोपाल श्रीकृष्ण डाबेराव (वय ४४) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी तनुजा गोपाल डाबेराव (वय १८) ही २१ फेब्रुवारी रोजी दुपारी साधारण १.४५ वाजताच्या सुमारास घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेली. सुरुवातीला ती मैत्रिणीकडे गेली असेल, असा समज कुटुंबीयांनी करून घेतला. पण सायंकाळ होऊनही ती घरी परत न आल्यामुळे घरच्यांची चिंता वाढली.
त्यानंतर वडील आणि नातेवाईकांनी गावात, नातेवाईकांकडे आणि इतर ठिकाणी तिचा शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. शेवटी गोपाल डाबेराव यांनी २२ फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मिसिंग दाखल करून तपास सुरू केला आहे.
तनुजाची उंची अंदाजे ५ फूट २ इंच असून बांधा सडपातळ आहे. रंग निमगोरा, चेहरा लांबट, केस काळे व लांब आणि डोळे काळे आहेत. घरातून निघताना तिने कथ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाची लेंगी घातलेली होती.
वरील वर्णनाची पोरी कुठं दिसल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास नांदुरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असं आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार सोळंके यांनी केलं आहे.














