डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर ट्रक व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
या अपघातात सुखदेव बारसकर (रा. ऐनखेड, पोस्ट काकली दामोना, बैलकुंद, जि. बैतुल, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. जनकलाल शामराव चिलाटे (वय २८, रा. कालवा, ता. आटनेर, जि. बैतुल, मध्यप्रदेश) हेही ट्रकमध्ये होते. ट्रक चालक नारायण रावसाहेब ठेंग (रा. खंडाळा, मकरध्वज, ता. चिखली, जि. बुलढाणा) हा टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक एमएच-२८-बीबी-५४४४) घेऊन लोखंडी टिनशेडचे पोल वाहतूक करत चिखलीहून मेहकरमार्गे कारंजा लाडकडे जात होता.
समृद्धी महामार्गावरील नागपूर लेनमध्ये चॅनल क्रमांक २६९ जवळ भारत पेट्रोल पंपासमोर चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकमध्ये बसलेले सुखदेव बारसकर यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.














