चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील गजबजलेल्या जयस्तंभ चौकातील बाँबे मार्केट परिसरात १५ मार्च रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.
अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखली व बुलडाणा येथील अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दोन तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे आग आणखी पसरू न देता मोठा अनर्थ टळला. आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या आगीत फारूक बागवान यांची फ्रूट गाडी, दीपक कांताअप्पा बोंद्रे व सचिन कांताअप्पा बोंद्रे यांचे अंबिका अॅग्रो सेंटर, गुणवंत त्र्यंबक उमाळकर यांचे वसुधारा अॅग्रो सेंटर, शे. फकिरा व शे. रज्जाक बागवान यांचे फ्रूट दुकान, जयंतीलाल सुतरिया यांचे दाबेली सेंटर, किरण घोलप यांचे जगदंबा वॉच सेंटर, एकनाथ हांडगे यांचे हांडगे मामा सेंटर तसेच राजेश राजपूत यांचे राजपुत भेळ सेंटर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान घटनास्थळी आमदार श्वेता महाले, नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर तसेच नगरसेवक सुहास शेटे, सागर पुरोहित, काशीनाथ बोंद्रे, कुणाल बोंद्रे व सचिन शेटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.













