बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
बुलढाणा शहरातील इकबाल नगर परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रशांत प्रकाश अंभोरे उर्फ ‘बबलू पेंटर’ असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रशांतचा मोठा भाऊ विलास अंभोरे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते घरी परतल्यानंतर दरवाजा उघडताच प्रशांतने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. ‘बबलू पेंटर’ या नावाने परिसरात परिचित असलेल्या प्रशांतच्या निधनाची बातमी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, प्रशांतने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बुलढाणा शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.














