चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी गजानन घुबे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते आपल्या साध्या, मनमिळावू स्वभावामुळे व समाजकार्यातील सहभागामुळे सर्वांना परिचित होते.
गजानन घुबे हे गावातील पहिले बागायतदार शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या शेतात विविध प्रकारची पिके घेऊन तसेच प्लॉट पद्धतीने शेती करून आधुनिक शेतीचा आदर्श उभा केला होता. शेतीबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही ते सक्रियपणे सहभागी होत असत, त्यामुळे गावात त्यांना विशेष मान होता.
१२ तारखेला उपचारासाठी उत्तर प्रदेश येथे हॉस्पिटलमध्ये जात असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देऊळगाव घुबे गावावर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व मोठा मित्रपरिवार असा आप्तेष्टांचा परिवार आहे.












