Advertisement Advertisement

लग्नासाठी तरुणीवर जबरदस्ती; तिचं लग्न जमले त्यांना माहित पडले, मग ठरलेले लग्न मोडले…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव तालुक्यातील २१ वर्षीय तरुणीला लग्नासाठी जबरदस्ती करत तिचे ठरलेले लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी सम्यक देवानंद इंगळे (रा. लोणी गुरव) याच्यासह चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरुणी बारावी उत्तीर्ण असून सध्या घरीच आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी सम्यक इंगळे याने मैत्रीचा गैरफायदा घेत वारंवार लग्नासाठी दबाव टाकला व तिचा पाठलाग केला. तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरल्यानंतर आरोपी सम्यक इंगळे व सुनिता इंगळे यांनी तिच्या घरी जाऊन तिला उचलून नेण्याची तसेच लग्न होऊ न देण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने नियोजित सासरच्या मंडळींना चुकीची माहिती देऊन ठरलेले लग्न मोडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी तरुणी तिच्या वडिलांसह आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा हात धरून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच इतर आरोपींनी तिच्या आई-वडिलांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!