चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):
सततची नापीकी, वाढते कर्ज आणि आर्थिक विवंचनेतून ३२ वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २८ जानेवारी रोजी अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनुबाई येथे घडली.
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मनुबाई येथील शेतकरी शंकर बाजीराव वायाळ यांच्याकडे शिवारातील गट नंबर २६६ मध्ये अंदाजे दोन ते तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, मेरा खुर्द शाखेकडून ७० हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. यावर्षी शेतात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती; मात्र हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे पीक पूर्णतः उध्वस्त झाले.
पीक हातचे गेल्याने कर्जाची परतफेड शक्य न झाल्यामुळे कुटुंबावर आर्थिक ताण वाढत गेला. या परिस्थितीमुळे शंकर वायाळ यांचा लहान मुलगा नितीन शंकर वायाळ (वय ३२) हा मानसिक नैराश्यात होता. अखेर त्याने शेतात आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याची नोंद आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली असून, ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पोफळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.












