देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :देऊळगावराजा शहरात मंदिरांवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा अखेर पर्दाफाश झाला असून, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाने धडाकेबाज कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील प्रसिद्ध चौंडेश्वरी देवी मंदिर, कोठवाडा मारुती मंदिर तसेच इतर मंदिरांमध्ये दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार २२ जानेवारी रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते.
गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे २७ जानेवारी रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी मंदिर चोरीसह मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती तसेच एक मोटारसायकल असा एकूण १,२३,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अन्सार उर्फ छोट्या शेख (वय २५) वअरविंद लक्ष्मण शिंदे (वय ३५, दोघेही रा. देऊळगावराजा) यांचा समावेश आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. निलेश राजपूत, मपोकॉ. पूजा जाधव, चापोहेकॉ. समाधान टेकाळे तसेच देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोनि. ब्रह्मा गिरी (ठाणे प्रभारी) व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.
या धडाकेबाज कारवाईमुळे मंदिर चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांतून पोलिसांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे.













