चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात चिखली येथे मंगळवारी काढण्यात आलेल्या महामोर्चाला हजारो भीमसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, चिखलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चातून उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या निमित्ताने विविध आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने एकवटल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
सकाळपासूनच जिल्हा परिषद मैदानावर भीमसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आल्यानंतर शांततेच्या मार्गाने महामोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद मैदानापासून बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या घोषणा देत मोर्चा पुढे सरकला.
महामोर्चात विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी रुक्मिणीताई लोंढे, लक्ष्मण शेळके, दादासाहेब शेळके, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, दीपक केदार यांच्यासह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून आंबेडकरी समाजाला तोडण्याचे प्रयत्न होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. समाजात मतभेद निर्माण करून ऐक्याला तडा देण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र राहण्याचे आवाहन करण्यात आले. अनुसूचित जातींमधील ५९ जातींचे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दादासाहेब शेळके यांनी संविधान आणि न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी सामाजिक न्यायाच्या लढ्यात त्यागाशिवाय यश मिळत नसल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या ऐक्याच्या लढ्यात फूट पाडणारा ‘मिठाचा खडा’ पडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. मातंग समाजासह सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन सामाजिक न्यायाची लढाई पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दीपक केदार यांनी खासगीकरणामुळे सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या या महामोर्चामुळे चिखली शहरात दिवसभर आंबेडकरी विचारांचा जयघोष ऐकू येत होता. उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यासह सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.












