Advertisement Advertisement

मन नदीच्या पुरात बैलगाडीसह २७ वर्षीय शेतकरी वाहून गेला; चार बैलांचा मृत्यू! वाळूमाफियांनी खोदलेल्या २० ते २५ फुटांच्या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्याचा आरोप; तरुणाचा शोध सुरू….

शेगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील दिवसभराचे काम आटोपून बैलगाडीने घराकडे परतत असताना अचानक मन नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने २७ वर्षीय शेतकरी बैलगाडीसह वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास लोहारा येथे घडली. या दुर्घटनेत बैलगाडीला जुंपलेले आणि मागे बांधलेले अशा चारही बैलांचा मृत्यू झाला असून, वाहून गेलेल्या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही.

शाहिद आसिफ देशमुख (वय २७) असे बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लोहारा हे शेगावपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असून ते बाळापूर तालुक्यात येते.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद देशमुख हा आपल्या एका साथीदारासह बैलगाडीने मन नदीच्या कडेने घराकडे परतत होता. त्यावेळी अचानक नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याने निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बैलगाडी पाण्याच्या प्रवाहात अडकली आणि काही क्षणांतच बैलगाडीसह शाहिद पाण्यात वाहून गेला.

शाहिदसोबत असलेल्या साथीदाराने प्रसंगावधान राखत पाण्याबाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र शाहिदचा पाण्याच्या प्रवाहात शोध लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

वाळूमाफियांच्या खड्ड्यांवरून संताप….

मन नदीच्या पात्रात वाळू उपशासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. नदीपात्रात तब्बल २० ते २५ फूट खोल खड्डे निर्माण झाल्याने पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर त्याचा अंदाज येत नसल्याचे सांगितले जात आहे.

या जीवघेण्या खड्ड्यांमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत असून, अवैध वाळूउपशाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

पत्नी, दोन लहान मुलांवर संकट….

शाहिद देशमुख याच्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. कुटुंबातील कर्ता व्यक्ती बेपत्ता असल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून शाहिदचा शोध सुरू असून, मन नदीच्या पात्रातील वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि नदीपात्रातील खोल खड्डे यामुळे शोधमोहीमेला अडचणी येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!