Advertisement Advertisement

“आता बस झालं!” म्हणत परिचारिकांनी काम बंद केलं; प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाण्यात जोरदार आंदोलन!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : परिचारिका संवर्गाच्या विविध न्याय्य मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्यव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देत बुलढाण्यात परिचारिकांनी मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी दोन तास काम बंद आंदोलन केले. राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच क्षय आरोग्यधाम, जिल्हा क्षय रुग्णालय बुलढाणा येथे परिचारिकांनी एकत्र येत शासनाच्या प्रलंबित धोरणांविरोधात तीव्र निदर्शने केली.

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन, जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या वतीने सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत हे काम बंद आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाचे सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतिबंध, पदोन्नती प्रक्रिया आणि सरळ सेवा भरती तातडीने अंतिम करावी, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

१५० दिवसांचा कार्यक्रम संपूनही मागण्या प्रलंबित….

शासनाने २ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने ‘१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम’ जाहीर केला होता. या कार्यक्रमांतर्गत विविध विभागांनी सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतिबंध, पदोन्नती, रिक्त पदांची भरती तसेच इतर प्रलंबित सेवाविषयक बाबी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, या कार्यक्रमाची मुदत २ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूनही परिचारिका संवर्गाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवाविषयक बाबी अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा…

परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा जयश्री वाघ आणि जिल्हा सरचिटणीस मंगेश शिरसाठ यांनी दिला.

या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील परिचारिका तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रलंबित सेवाविषयक मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!