बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, यंदा बुलडाणा जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी शासनाने १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सोमवार, ३ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ४११ शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची माहिती संबंधित विमा कंपनीच्या आकडेवारीतून समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार १ लाख ३५ हजार ४४१ अर्ज पीक विम्यासाठी दाखल झाले आहेत.
यामध्ये ९ हजार ६४ कर्जदार शेतकरी, तर २ लाख ४१ हजार २५० बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे १ लाख ७९ हजार ४० हेक्टर पीकक्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या प्रीमियमपोटी २,१६१.५१ रुपये भरल्याची आकडेवारी देण्यात आली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिसाद कमी…
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार केवळ सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला असून, मोठा शेतकरीवर्ग अद्याप विमा संरक्षणाबाहेर आहे.
शासनाने पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविल्याने, आता उर्वरित दिवसांत अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीकनिहाय प्रतिहेक्टर विमा हप्ता….
पीक| प्रतिहेक्टर विमा हप्ता
सोयाबीन| ₹१,२५०
कापूस| ₹१,३००
तूर| ₹९४०
मूग| ₹७५
उडीद| ₹६७.५०
मका| ₹१००
शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी विमा काढण्याचे आवाहन….
खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे संरक्षण ठरू शकते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी १० ऑगस्टची अंतिम मुदत लक्षात घेऊन वेळेत पीक विमा काढावा, असे आवाहन करण्यात येत आहे.













