मोताळा/बोराखेडी (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतीच्या वादातून ४२ वर्षीय शेतकऱ्याची लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २५ जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चिंचपूर येथे उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, गुन्ह्यात आणखी तीन ते चार जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासातून व्यक्त करण्यात येत आहे.
मृत शेख नईम शेख सलीम (वय ४२, रा. मोताळा) यांची चिंचपूर शिवारात शेती होती. तसेच ते तेथे विटभट्टीचा व्यवसायही करत होते. गुरुवारी सकाळी ते मोटारसायकलने मोताळ्याकडे परतत असताना चिंचपूर येथील रस्त्यावर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
सकाळी सुमारे ७ वाजता शेख नईम यांचे भाऊ शेख मोबीन शेख सलीम यांना गणेश भोकरे यांनी फोन करून शेख नईम यांचा मोटारसायकल अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर शेख मोबीन व त्यांचा पुतण्या घटनास्थळी पोहोचले असता, शेख नईम हे पांडुरंग गंगाराम मापारी यांच्या घराजवळील रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात, डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत मृत पडलेले आढळले.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
शेख मोबीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश सिताराम मापारी याने “तू चिंचपूर येथे का येतो?” असा जाब विचारत लाकडी दांडक्याने शेख नईम यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या आईनेही “हे कृत्य माझ्या मुलानेच केले,” असे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी निलेश सिताराम मापारी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार सिताराम मेहेत्रे करीत आहेत.
शेतीच्या व्यवहारातून निर्माण झाला वाद….
फिर्यादीनुसार, चिंचपूर शिवारातील गट क्रमांक ४२/३ मधील शेती खरेदीचा व्यवहार पूर्ण झालेला नसून सातबाऱ्यावरील वारसांच्या नावांवरून वाद सुरू होता. याच कारणावरून शेख नईम यांना “तू ही शेती कशी पेरतो, तुला पाहून घेतो,” अशी यापूर्वी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे या हत्येत मुख्य आरोपीव्यतिरिक्त आणखी तीन ते चार जणांचा सहभाग असण्याची शक्यता फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट….
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रोही यांनी घटनास्थळी भेट देत तपास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.













