Advertisement Advertisement

सोनाळ्यातून माय-लेकीचा पत्ता नाही; बँकेत जाते म्हणत निघाल्या, तीन दिवस झाले तरी ठावठिकाणा नाही….!

संग्रामपूर(बुलडाणा कव्हरेज न्युज): सोनाळा गावात एक माय आणि तिची लहानगी लेकरू बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोघींचा काहीच मागमूस लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून गावातही चर्चा रंगली आहे. याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाणे येथे हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाळा येथील रहिवासी राजकन्या निरंजन वानखडे यांची सून पुनम राहुल वानखडे (वय ३५ वर्षे) ही १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास “बँकेचं काम आहे” असं सांगून आपली सात वर्षांची मुलगी प्रणिता हिला सोबत घेऊन घराबाहेर पडली. मात्र, संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी माय-लेकी घरी परतल्या नाहीत.

कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे, ओळखीच्या ठिकाणी आणि आसपासच्या गावात शोध घेतला, पण दोघींचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर १४ फेब्रुवारी रोजी कुटुंबीयांनी सोनाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.

माय-लेकींचे वर्णन असे:

पुनम वानखडे – उंची साधारण ५ फूट, रंग गोरा, चेहरा गोल, केस साधारण, अंगात पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि निळ्या रंगाची ओढणी.

प्रणिता वानखडे – उंची साधारण ४ फूट, रंग गोरा, चेहरा गोल, बॉब कट केस, अंगात निळ्या रंगाचा डिझाइनर फ्रॉक व पायात सँडल.

दरम्यान, या वर्णनाची महिला व चिमुकली कुठेही आढळून आल्यास त्वरित सोनाळा पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गावात मात्र एकच चर्चा – “कुठं गेल्या माय-लेकी?” पोलिसांनी लवकर शोध लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!