लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज):लोणार शहरातील ब्राह्मण गल्लीत ब्राह्मण समाजासाठी उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे उद्घाटन माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक पार पडले. तत्कालीन आमदार असताना संजय रायमूलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या ४० लाख रुपयांच्या निधीतून या आकर्षक सभामंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रा. बळीराम मापारी हे होते. संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री हा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी गणेश मूर्तीचे पूजन संजय रायमूलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
लोणार शहरात विविध समाज बांधवांसाठी तसेच धार्मिक ठिकाणी एकूण सात सभामंडपांचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यातील ब्राह्मण गल्लीत उभारलेला सभामंडप अतिशय आकर्षक स्वरूपात साकारण्यात आला आहे.
याप्रसंगी शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, युवासेनेचे तालुकाप्रमुख गजानन मापारी, सचिन कापुरे, शालिक इव्हळे, समाधान साबळे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांचा सत्कार सुधीर काळे, प्रल्हाद कुंडे, संकेत कुन्हे, बाळू कुचे, कैलास इंगळे, राम उंबरकर यांनी केला.
यावेळी बोलताना संजय रायमूलकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला. लोणार विकास प्रकल्पासाठी ४०० कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला असून, पाणीपुरवठा योजनेसाठीही भरघोस निधी मिळाला आहे. आगामी काळातही महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे अखंड सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रा. बळीराम मापारी यांच्यासह चत्ता कुंडे, अनिल कुंडे, द्वारकाप्रसाद व्यास, श्रीराम काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ब्राह्मण समाजातील अनेक गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













