धा. बढे(बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. मात्र, जुन्या बसगाड्या व खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना मोताळा तालुक्यातील कोन्हाळा–खेडी रस्त्यावर गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मलकापूर आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल चरीत उतरली. या अपघातात बसमधील १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मलकापूर आगाराचे चालक सुरडकर हे मलकापूर ते कुन्हा गोतमारा मार्गावर बस क्रमांक एम.एच. ४० एन. ९४८६ घेऊन गेले होते. गोतमारा येथून मलकापूरकडे परत येताना कोन्हाळा–खेडी रस्त्यावर एका बाजूचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक अरुंद मार्गाने सुरू होती. रस्त्यावर टाकलेला मातीचा भराव व अरुंद रस्ता यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या बाजूच्या खोल चरीत उतरली.
बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करीत होते. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले.
दरम्यान, मलकापूर–कुन्हा गोतमारा रस्त्याचे काम दीर्घकाळापासून रखडले असून, सुरक्षा नियमांचे पालन न करता मातीचा उपसा व भराव करण्यात आल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.















