धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी

धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्ला
पोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी


धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज):
धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावरून चोरट्यांनी तीन दुचाकी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३ जानेवारीच्या रात्री दोन, तर २१ जानेवारीच्या रात्री एक दुचाकी चोरीला गेली असून, या घटना पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, धाड पोलीस स्टेशनच्या पूर्वेला एचडीएफसी बँकेसमोरून एक, पश्चिमेला हॉटेल निराळा परिसरातून दुसरी, तर दक्षिणेकडील भागातून तिसरी दुचाकी चोरीला गेली. विशेष म्हणजे यातील दोन दुचाकी चोरीप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तिसऱ्या घटनेबाबत २३ जानेवारी रोजी सायंकाळी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमित रात्रगस्त असते. मात्र, पोलीस स्टेशनच्या इतक्या जवळ चोरीच्या घटना घडल्याने गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस स्टेशनच्या परिसरातच चोऱ्या होत असतील, तर ग्रामीण भाग व शहरातील इतर परिसर किती सुरक्षित आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी चोरट्यांचा शोध घ्यावा, तसेच गस्तीमध्ये कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी धाडवासीयांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!