लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज):लोणार तालुक्यातील किन्ही रोड शिवारात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रभाकर सखाराम जाधव (वय ६९, रा. माळीपुरा, लोणार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास समीर खान रियाज खान (वय २२, रा. लोणार) हे आपल्या शेतातील पाहणीसाठी गेले असता, आंब्याच्या झाडाजवळ प्रभाकर जाधव हे झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. आवाज देऊन तसेच हलवून पाहिले असता कोणतीही हालचाल न झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत समीर खान यांनी लोणार पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या उत्तरीय तपासणीत प्रभाकर जाधव यांच्या शरीरावर सर्पदंशाची लक्षणे आढळल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













