Advertisement Advertisement

“शेळगाव आटोळमध्ये रस्त्याअभावी अंत्यविधीला अडथळे; युवक आक्रमक” ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले जाईल.!

शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) :गावातील वैदुवाडी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे गावातील युवक आक्रमक झाले असून स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता तातडीने तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा रस्ता न झाल्यास येत्या २ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा युवकांनी दिला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी असतानाही गावातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. शेळगाव आटोळ ही मेरा खुर्द जिल्हा परिषदेत सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, सदस्यांमधील वादामुळे अनेक कामे थांबलेली आहेत. हा वाद थेट हायकोर्टापर्यंत पोहोचला, तरीही प्रश्न सुटलेला नाही. परिणामी, गावातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

कालच गावातील एका तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने गावकरी स्मशानभूमीत गेले असता, रस्ता नसल्याने त्यांना प्रचंड कसरत करावी लागली. काहींना लांबच उभे राहावे लागले.

याच पार्श्वभूमीवर गावातील करण यंगड, शक्ती शिंदे, अशोक खर्डे, संघर्ष बोर्डे, संकेत बोर्डे, शुभम हिवाळे, विठ्ठल मिसाळ, पवन अंभोरे, मयूर वाघमारे, आदित्य इंगळे, सुरज निकाळजे, संदेश घेवंदे, तेजस आणि शुभम गावडे यांच्यासह इतर युवकांनी या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली आहे.

युवकांनी स्पष्ट केले की, २ सप्टेंबरपर्यंत स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले जाईल आणि प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत ग्रामपंचायत उघडू दिली जाणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!