बुलडाणा ( बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली-जालना राष्ट्रीय महामार्गावरील मेरा खुर्द चौकात ४२ वर्षीय इसमाचा भरदिवसा दोघांनी मिळून गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना २३ जून रोजी घडली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक केली. आज न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही २ दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव भारत गजानन विरशीद (वय ३२, रा. नांद्राकोळी, ता. बुलडाणा) असे असून, तो चिखलीमध्ये असताना आरोपीने पैशाच्या देवाण-घेवाणीच्या निमित्ताने त्याला मेरा खुर्द फाट्यावर बोलावलं होतं.भारत विरशीद चिखलीहून देऊळगावराजा मार्गावर जाणाऱ्या काळी-पिवळी गाडीतून मेरा खुर्द फाट्यावर पोहोचला. गाडीतून खाली उतरल्याबरोबर दोघांनी एकदम धारदार चाकूंनी सपासप वार करून गळा चिरून खून केला. खून इतका अमानुष होता की आरोपींपैकी एकाने छातीत बसून मानच कापली.
खुल्या रस्त्यावर भयंकर दृश्य!
ही घटना रस्त्यावर शेकडो प्रवाशांच्या समोर, तसेच आसपास व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या नजरेसमोर घडली. तरीही कुणीही आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. अवघ्या दोन-तीन मिनिटांत हत्या करून आरोपी पळाले.
पोलीसांची जलद कारवाई…
ही गंभीर घटना घडताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल तांबे आणि उपविभागीय अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा चे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी तातडीने तपास सुरू केला. काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
कोण आहेत आरोपी?
मृतकाचा भाऊ शरद विरशीद यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसात गुन्हा क्रमांक ०१८१/२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपींची नावे अशी आहेत:ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे (रा. वरुड बु., ता. जाफ्राबाद, जि. जालना)मनोज केरूबा इच्चे (रा. खोर, ता. चिखली, जि. बुलडाणा)या दोघांविरुद्ध कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सख्ख्या मेव्हण्याने साल्याचा खून का केला?
या प्रकरणात एक महत्त्वाची बाब अशी की मृतक आणि आरोपी यांचे नाते सख्ख्या मेव्हणा-साल्याचे होते. त्यामुळे हे खून वैयक्तिक कारणातून झाला की आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.न्यायालयाने दोन्ही आरोपींना २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, २६ जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्या दिवशी या खून प्रकरणामागील खरे कारण उघडकीस येण्याची शक्यता आहे.