बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मतदार यादीतील नावांची नोंद कायम ठेवण्यासाठी आणि पात्र मतदारांना नाव नोंदणीची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-२०२६) राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, २८ नोव्हेंबर आणि रविवार, २९ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंद असलेल्या प्रवर्गातील पात्र मतदारांना आपली नोंद सुनिश्चित करण्यासाठी गणना प्रपत्र (EF) सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे हे प्रपत्र दाखल करता येणार आहे. त्यामुळे ज्या पात्र मतदारांची गणना प्रपत्रे अद्याप जमा झालेली नाहीत, त्यांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेणे आवश्यक आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण आणि संकलन करण्यात येत आहे. प्राप्त झालेली गणना प्रपत्रे १० डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार असून, मतदार यादीचे अंतिम प्रकाशन २२ डिसेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, मतदार यादीतील आपली नोंद कायम राहावी आणि पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत, यासाठी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन गणना प्रपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.














