Advertisement Advertisement

मध्यरात्री घराचे कुलूप तोडले, पण घरमालक जागा झाला अन् चोरट्यांची पळापळ! चोर-चोर’ असा आरडाओरडा करताच चोरट्यांनी ठोकली धूम…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील गोविंदनगर परिसरात मध्यरात्री घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. मात्र, घरमालकाला अचानक जाग आल्याने चोरट्यांचा डाव फसला. घरमालकाने ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा करताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे, घटनास्थळी एक मोटारसायकल संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

याप्रकरणी सुमित राजेंद्र जयस्वाल (वय ३५, रा. गोविंदनगर, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जयस्वाल हे १५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घराच्या चॅनेल गेटला कुलूप लावून झोपले होते. रात्री सुमारे १२.२० वाजताच्या दरम्यान त्यांना कुलूप तोडल्याचा आवाज ऐकू आला. आवाजामुळे जागे झालेल्या जयस्वाल यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता चॅनेल गेटचे कुलूप तोडलेले दिसून आले.

याचवेळी घराच्या मागील बाजूने काही जणांच्या बोलण्याचा आवाजही येत होता. त्यामुळे जयस्वाल यांनी प्रसंगावधान राखत ‘चोर-चोर’ असा जोरात आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकताच घरफोडीच्या प्रयत्नात असलेले अज्ञात चोरटे तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी आणि पोलिसांनी परिसरात चोरट्यांचा शोध घेतला; मात्र ते हाती लागले नाहीत.

दरम्यान, घटनास्थळी एक मोटारसायकल संशयास्पद स्थितीत आढळून आली. त्यामुळे या मोटारसायकलचा आणि चोरीच्या प्रयत्नाचा काही संबंध आहे का, याचा तपास होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी रात्री खामगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद शेळके करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!