Advertisement Advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलडाण्याच्या दौऱ्यावर; मेहकरात शेतकऱ्यांचा मेळावा, कुणाला काय मिळणार? वाचा संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): दुष्काळाच्या संकटाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथराव शिंदे आज, शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी मेहकरच्या शारंगधर नगरीत दाखल होणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता डी.पी. रोडवरील रिलायन्स मॉलसमोर भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमात शेतकरी कुटुंबातील विधवा, परित्यक्ता तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीचे धनादेश दिले जाणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही मदतीचे धनादेश वितरित करण्यात येणार आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींना भाऊबीजेची भेट म्हणून साड्या व दिवाळी आनंदाचा शिधा किट देण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे.

केवळ शेतकरी मदतीपुरताच हा मेळावा मर्यादित नसून, विविध लोककल्याणकारी योजनांचे लाभही यावेळी दिले जाणार आहेत. शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण, नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण, दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्याचे वाटप आणि संजय गांधी निराधार योजनेतील पात्र महिलांना मंजुरी आदेश देण्यात येणार आहेत. तसेच युवा सेनेच्या वतीने गुरांसाठी चारा वाटपाचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मंगरूळ येथील प्रशासकीय व कृषी औद्योगिक महाविद्यालयाचा तसेच जगन्नाथ जामोठे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रमही याच सोहळ्यात पार पडणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे ऑनलाइन लोकार्पण व भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार आहे.

या भव्य मेळाव्यासाठी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतकरी कुटुंबे, महिला, विद्यार्थी आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!