डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. भरधाव वाहनांचा वेग आणि ओव्हरटेकच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गौरव पांडे असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक (एमएच ०९ जीजे ७३१५) नागपूर येथून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २९६.०५ (मुंबई कॉरिडॉर) येथे पोहोचताच चालक शिवानंद हांचिनायटी (वय ३५, रा. नागपूर) याने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बसची समोरील वाहनाला धडक बसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली बस महामार्गाच्या बाजूच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दोन दुभाजकांच्या मधोमध जाऊन अडकली.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, बसमधील प्रवासी गौरव पांडे हे बसच्या डाव्या बाजूने बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील अन्य पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून मिळताच वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे ए. एस. मंगेश खडसे, हवालदार आराख, पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच अपघातस्थळी बॅरिकेडिंग करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.
समृद्धीवर वेगाचा कहर कधी थांबणार?
दररोजच्या अपघातांच्या घटनांमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ओव्हरटेकच्या घाईत निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागत असल्याने महामार्गावरील वेग नियंत्रण आणि वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.













