बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकराजाखाली असलेल्या बुलढाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रतीक्षा आता पुन्हा चर्चेत आली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाचे नवे गणित समोर येत असून, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या गटांची संख्या १६ वरून १५ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षणाची एकत्रित मर्यादा ५० टक्क्यांच्या आत ठेवताना ओबीसींचा एक गट कमी होऊ शकतो, अशी चर्चा प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. हरकती व सूचनांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जातींसाठी १२, अनुसूचित जमातींसाठी ३, तर ओबीसी प्रवर्गासाठी १६ गट राखीव ठेवण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण ३१ गट आरक्षित झाले होते. हे प्रमाण ५०.८२ टक्के असल्याने सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ५० टक्क्यांच्या मर्यादेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय आहे ओबीसींच्या एका गटाचे गणित?
जिल्हा परिषदेचे एकूण ६१ गट लक्षात घेता ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. त्यामुळे अनुसूचित जातींचे १२ आणि अनुसूचित जमातींचे ३ गट कायम धरल्यास ओबीसी प्रवर्गासाठी उर्वरित १५ गटच राखीव ठेवता येतील. परिणामी, ओबीसींचे १६ गट थेट १५ वर येण्याची शक्यता आहे. अर्थात, यासंदर्भात अद्याप प्रशासनाला आयोगाकडून अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नसल्याने हे चित्र सध्या चर्चेच्या पातळीवरच आहे.
नियम १२ मुळे आरक्षणाची फेरपालट नव्याने!
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या २०२५ च्या आरक्षण नियमांमधील नियम १२ नुसार, हे नियम लागू झाल्यानंतर होणारी पहिली सार्वत्रिक निवडणूक आरक्षण फेरपालटीचा प्रारंभबिंदू मानली जाणार आहे. या तरतुदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी फेटाळल्याची माहिती आहे. एखादा विशिष्ट गट कायमस्वरूपी अनुसूचित जाती किंवा जमातींसाठी आरक्षित राहावा, असा हक्क मतदार अथवा उमेदवाराला नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आणि गटांची फेरपालट या दोन स्वतंत्र बाबी असल्याचेही या संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे.
पाच वर्षांपासून प्रशासकराज; निवडणुकीची प्रतीक्षा कायम!
बुलढाणा जिल्हा परिषदेत गेल्या पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुकांच्या वेळी जिल्हा परिषद निवडणुकाही होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त काही लागला नाही. आता आरक्षणाच्या नव्या गणितामुळे पुन्हा राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. ओबीसींचा एक गट कमी होणार की आरक्षणात आणखी काही बदल होणार, याकडे इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या पुढील अधिकृत आदेशानंतरच गटवार आरक्षणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.













