शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील खळवाडी परिसरातून दोन अल्पवयीन मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आर्यन ज्ञानेश्वर वानखडे (वय १२) आणि मानव जितेंद्र मानकर (वय १३) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आणि मानव हे दोघेही २७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता घरातून एकत्र कुठेतरी निघून गेले. बराच वेळ उलटूनही दोघे घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच शेगाव परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, दोघांचाही ठावठिकाणा लागला नाही.
यानंतर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दोन्ही मुलांना फूस लावून पळवून नेले असावे, अशी शंका व्यक्त करत आर्यनचे वडील ज्ञानेश्वर जगदेव वानखडे (वय ३८, रा. खळवाडी परिसर, शेगाव) यांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही मुलांचा शोध सुरू केला आहे.
बेपत्ता मुलांचे वर्णन : आर्यन वानखडे हा गोऱ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा असून त्याची उंची सुमारे १४० सेंटीमीटर आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि कथ्थ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या उजव्या हातावर ‘आई-बाबा’ असे गोंदलेले आहे.
मानव मानकर हा गोऱ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा असून त्याची उंची सुमारे १४५ सेंटीमीटर आहे. त्याने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि विटकरी रंगाची शाळेची पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर स्टारचे गोंदण आहे.
दोन्ही मुलांबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने शेगाव शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत.














