शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शाळेत ये-जा करणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा काही दिवसांपासून पाठलाग करून रस्त्यात अडविल्याची घटना शेगाव तालुक्यात घडली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी एका इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून तिची लहान बहीण सहावीत शिकते. दोघी बहिणी इलेक्ट्रिक दुचाकीने दररोज शेगाव येथे शाळेत ये-जा करतात. दरम्यान, एकफळ येथील राजकुमार परदेशी हा मागील ८ ते १० दिवसांपासून त्यांचा पाठलाग करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
२० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आईसोबत गावातील भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडविले. यावेळी अश्लील शेरेबाजी करून त्रास दिल्याचा आरोप मुलीने केला आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांसह शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राजकुमार परदेशी याच्याविरुद्ध BNS कलम ७५(१), ७८, ७९ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.












