चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर वादग्रस्त ठरलेल्या सहशिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक झाली आहे. संबंधित शिक्षकाची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी संतप्त पालक व ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला थेट कुलूप ठोकले. प्रशासनाने सोमवारी या प्रकरणी योग्य निर्णय न घेतल्यास मंगळवारी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर सहशिक्षक अनिल सुरेश दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासन आणि गावकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पूर्वकल्पना देऊन संबंधित शिक्षकाची नियुक्ती रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून संबंधित शिक्षकाला रुजू करून घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आधीही दोन शाळांमध्ये विरोध; मिसाळवाडीतही संतापाचा भडका….
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षकाच्या नियुक्तीला यापूर्वी शेळगाव आटोळ आणि अमोना येथील जिल्हा परिषद शाळांमध्येही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या हा आधीच चिंतेचा विषय असताना, वाद निर्माण झालेल्या शिक्षकाची नियुक्ती केल्यास मिसाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येवरही परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
नियुक्तीला विरोध दर्शवूनही प्रशासनाकडून एकतर्फी निर्णय घेतला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शनिवारी पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. आता सोमवारी प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण मिसाळवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
निर्णय नाही झाला तर मंगळवारी सीईओंच्या दालनासमोर आंदोलन…..
सोमवारी संबंधित शिक्षकाच्या नियुक्तीबाबत प्रशासनाने सकारात्मक व योग्य निर्णय न घेतल्यास, मंगळवारी मिसाळवाडी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ, सुनील मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.













