मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): ऑटोरिक्षामध्ये बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना मेरा खुर्द येथे घडली. याप्रकरणी शेख अफसर शेख मुखतार (वय ३०, रा. मेरा खुर्द) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिकेत निलेश जंगले, सतीश मोहबे आणि सोमा उदार यांच्याविरोधात अंढेरा पोलिसांत बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, १५ सप्टेंबर रोजी शेख अफसर हे चिखलीहून ऑटोरिक्षाने मेरा खुर्दकडे येत होते. यावेळी ऑटोरिक्षात बसण्याच्या कारणावरून त्यांचा अनिकेत जंगले याच्यासोबत वाद झाला. त्यानंतर गावातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अनिकेत जंगले, सतीश मोहबे आणि सोमा उदार यांनी अफसर यांना अडवून पुन्हा वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सायंकाळी तिघांनी अफसर यांच्या घरासमोर येऊन त्यांच्यासोबत झटापट केल्याचा आरोप आहे. यावेळी अफसर यांना पकडून ठेवण्यात आले, तर सोमा उदार याने विटेने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच अफसर यांचा भाऊ इजाज शेख यालाही अनिकेत जंगले याने विटेने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या झटापटीदरम्यान अफसर यांच्या आई रुकसाबी आणि पत्नी सलमा परवीन यांच्यासोबतही धक्काबुक्की व झटापट झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच संबंधित तिघांनी कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शेख अफसर यांनी अनिकेत जंगले, सतीश मोहबे आणि सोमा उदार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंढेरा पोलिसांकडे केली आहे.













