Advertisement Advertisement

घरकुलापासून शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत सगळंच अडकलं! योजना कागदावर अन् लाभार्थी वाऱ्यावर? मेहकर पंचायत समितीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जोरदार ठिय्या…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी तसेच सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पंचायत समिती मेहकर येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

भूमिहीन, गरजू नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मात्र, पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी ठोस आणि तातडीची कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास होत असलेला विलंब तसेच घरकुलासाठी उपलब्ध जागांचे नियमाकुलीकरण करण्यासंदर्भातील प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, गुरांचे गोठे तसेच इतर योजनांची प्रकरणेही अनावश्यकपणे प्रलंबित न ठेवता तातडीने मार्गी लावावीत, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी फळबाग लागवड योजनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचा लाभ तातडीने मिळावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी व गरजू नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

प्रलंबित प्रस्तावांवर वेळेत निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह गणेश गारोळे, प्रफुल्ल देशमुख, नंदू जाधव, अरविंद दांदडे, प्रवीण उतपुरे तसेच शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!