दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाण्याला डच्चू! रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल; “लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलंय का? मंत्रालयात जाऊन शेतकऱ्यांसाठी भांडा!” “एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाची यादी तयार करता? शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि पिकांची अवस्था पाहा!”; बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी; अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याचा रविकांत तुपकरांचा आक्रमक इशारा….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य सरकारने नुकतीच राज्यातील १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात न आल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः होरपळ झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याला दुष्काळसदृश यादीतून वगळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया तुपकरांनी दिली.दुष्काळसदृश परिस्थितीचा निर्णय मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून कागदावर घेतला जात असल्याचा आरोप करत तुपकरांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. “अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असती तर केवळ १८ नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळसदृश यादीत आले असते. शेतकऱ्यांना कमीत कमी मदत द्यावी लागावी म्हणूनच ही यादी तयार करण्यात आली आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बुलढाण्यात पिके करपली, तरी सरकारला दिसत नाही का?
बुलढाणा जिल्ह्यात तब्बल दीड महिन्याच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडला. कडक उन्हामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाऐवजी कडक ऊन पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला असला, तरी पिकांना आवश्यक असलेल्या काळात पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे तुपकरांनी म्हटले आहे.
बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या; हेक्टरी १ लाखांची मदत द्या!
बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्याला तातडीने दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करावे, कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.“शेतकऱ्याने पिकासाठी पैसा खर्च केला, मेहनत केली, रात्रंदिवस कष्ट केले. पाऊस नाही म्हणून पीक हातातून गेलं. आता सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं का? बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीत घ्या आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या,” अशी मागणी तुपकरांनी केली.
सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले खडे बोल!
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे एक खासदार आणि सहा आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींना लक्ष्य करत रविकांत तुपकरांनी थेट सवाल केला.“लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का? गल्लीत आणि मतदारसंघात राजकीय स्वार्थासाठी एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा मंत्रालयात जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी भांडा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे,” अशा शब्दांत तुपकरांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा दाखला देत तुपकरांचा नेत्यांना सवाल!
काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेते आपले राजकीय मतभेद आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून एका पॅनलमध्ये एकत्र आले आणि निवडणूक लढले. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येण्यास काय अडचण आहे? असा सवाल तुपकरांनी केला.“जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक आली तेव्हा सगळे पक्ष, सगळे नेते एका पॅनलमध्ये एकत्र आले. राजकीय जोडे बाजूला ठेवले. मग आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी का एकत्र येत नाही? शेतकऱ्यांच्या हितासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपापले पक्षीय मतभेद बाजूला ठेवावेत आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसावे. जोपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या यादीत बसत नाही, तोपर्यंत तिथून उठू नये,” अशा शब्दांत तुपकरांनी सत्ताधारी नेत्यांना सुनावले.
पश्चिम महाराष्ट्राचा आदर्श बुलढाण्यातील नेत्यांनी घ्यावा!
पश्चिम महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या काळात तेथील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकजूट दाखवली आणि मुख्यमंत्र्यांकडे नुकसानभरपाईची मागणी लावून धरली. त्यानंतर नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळवून देण्यात आली. याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांनीही शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे तुपकरांनी सांगितले.“पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला तेव्हा तिथले सर्वपक्षीय नेते एकत्र आले. आपापले मतभेद बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरली. सरकारकडून मोठी नुकसानभरपाई मिळवून घेतली. बुलढाणा जिल्ह्यातल्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. इथे आपसात भांडून काय मिळणार आहे? शेतकरी संकटात आहे. त्याच्यासाठी एकत्र या,” असे आवाहन तुपकरांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून बुलढाण्याचा दुष्काळ मंजूर करून घ्या!
दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांची यादी करताना बुलढाण्यासह दुष्काळाची झळ सोसणाऱ्या इतर जिल्ह्यांचाही समावेश करावा, अशी मागणी तुपकरांनी केली आहे. केवळ कागदावरील आकडे आणि अहवालाच्या आधारे निर्णय न घेता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली.“एसी केबिनमध्ये बसून दुष्काळ ठरवू नका. शेतकऱ्यांच्या बांधावर या, करपलेली पिकं पाहा, शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहा आणि मग निर्णय घ्या. बुलढाण्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र यावं आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीत बसवल्याशिवाय बाहेर पडू नये,” अशी आक्रमक भूमिका तुपकरांनी मांडली.
बुलढाण्याला कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा…
बुलढाणा जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्यावी आणि दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करावा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली.“बुलढाण्याला दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी एकत्र यावं. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. सत्ताधाऱ्यांना आमच्या स्टाईलने जाब विचारू आणि सळो की पळो करून सोडू,” असा आक्रमक इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.















