Advertisement Advertisement

शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ नका! पाऊस गायब, पिकं कोमेजली; तातडीने पंचनामे करून दुष्काळी मदत द्या!शेतकऱ्यांचा वीजपुरवठ्याबाबतही आक्रोश; दिवसा वीज द्या, नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी खरीप पिके कोमेजत असून अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी आवश्यक दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू भारत बोंद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असताना दुसरीकडे अनियमित वीजपुरवठ्यामुळे कृषिपंप चालवणेही कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अंधारात शेतात जावे लागत आहे. या वेळी साप, विंचू यांसह इतर धोके पत्करावे लागत असल्याने कृषिपंपांसाठी दिवसा नियमित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी बोंद्रे यांनी केली आहे. तसेच नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

पंचनामे करून दुष्काळी उपाययोजना लागू करा….

पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही बोंद्रे यांनी केली. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती आणि पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन प्रशासनाने विलंब न करता ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पालकमंत्र्यांशी थेट संपर्क; जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश….

जिल्हाधिकारी कार्यालयातून शंतनू बोंद्रे यांनी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज समस्येची माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्याचे बोंद्रे यांनी सांगितले.

पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना आता प्रशासनाच्या ठोस मदतीची अपेक्षा आहे. पिकांचे नुकसान वाढण्यापूर्वी पावसाची स्थिती, वीजपुरवठा आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!