चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली-खामगाव-जालना महामार्गावरील बेराळा फाटा येथे आज सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात केळवद येथील शेतकरी जागीच ठार झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.
भरधाव धावणाऱ्या एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
मृत शेतकऱ्याचे नाव संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८, रा. केळवद, ता. चिखली) असे असून, त्यांची पत्नी शिला संजय गायकवाड (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय गायकवाड व त्यांची पत्नी हे दोघेही केळवद येथून जाभोरा येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, बेराळा फाटा परिसरात संभाजीनगर ते हिंघणघाट मार्गावर धावणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात इतका जबर होता की, संजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शिला गायकवाड या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले व जखमींना तातडीने चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे केळवद गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत














