खामगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील मेन मार्केट परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून सोन्याची पोथ मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल मंठाजी मार्केड (वय ३१, रा. निरोड, ता. खामगाव) हे आपल्या पत्नीसह लग्नासाठी खरेदी करण्यासाठी २८ एप्रिल रोजी खामगाव येथे आले होते. सराफा बाजारातील कस्तुरचंद त्र्यंबकदास ज्वेलर्स येथून त्यांनी सोन्याचे दागिने खरेदी केले. त्यानंतर दुकानाबाहेर पोथ तयार करण्यासाठी दिली होती.
दुपारी सुमारे ५ वाजता दवाखान्यात जाऊन परत आल्यानंतर त्यांनी पोथ तयार करून घेतली व घरी परतले. मात्र घरी पोहोचल्यावर पर्स तपासली असता सोन्याची पोथ गायब असल्याचे लक्षात आले. गर्दीच्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १ पेंडल, ६६ लहान मणी व २ मोठे मणी असा समावेश असून एकूण वजन सुमारे ८ ग्रॅम आहे. या दागिन्यांची किंमत अंदाजे १ लाख २८ हजार १९९ रुपये इतकी आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार भिमराव वानखेडे करीत आहेत.














