साखरखेर्डा(बुलडाणा कव्हरेज न्युज): पांग्रीकाटे-लिंगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लिंगा (खेर्डा) गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वनवन भटकंती करावी लागत आहे. जलसंधारण योजनेतून गावासाठी नळयोजना मंजूर होऊनही गेल्या चार वर्षांपासून काम रखडले आहे. कामातील अनियमितता, दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजना अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
लिंगा (खेर्डा) हे गाव शेंदुर्जनपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असून गावाच्या पायथ्याशी राजेगाव तलाव आहे. या तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून अनेक गावांची तहान तो भागवत आहे. याच तलावातून लिंगा-खेर्डा गावांसाठी नळयोजना मंजूर झाली असली तरी विहिरीचे बांधकाम, पाइपलाइन टाकणे, वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक कारणांमुळे काम वारंवार अडथळ्यात आले. परिणामी गावातील विशेषतः दलित आणि मजूर कुटुंबांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून एका ड्रमसाठी ७० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी दररोज १०० ते २०० रुपये खर्च करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
राज्यात “घराघर नळ” योजनेची घोषणा होत असताना सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावे अजूनही पाण्यासाठी तडफडत असल्याचे वास्तव लिंगा गावाच्या उदाहरणातून समोर येत आहे. धरणात पाणी असताना गावात नळ कोरडे राहणे, ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची शोकांतिका असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
लिंगा गावात तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा जनार्दन श्रीराम बोरकर, मधूकर भालेराव, गजानन भालेराव, रामचंद्र चेके, आनंदा भालेराव, संजय मानवतकर यांच्यासह अनेक नागरिकांनी दिला आहे.
















