स्प्रिंकलर तोट्या चोरीप्रकरणी दोघांना अटक; ८ गुन्ह्यांची उकल, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त….

जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्याची वाढती चोरी चिंतेचा विषय ठरत असताना, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी प्रभावी कारवाई करत स्प्रिंकलरच्या तांब्याच्या तोट्या चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ८ चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


जिल्ह्यात शेतमाल व शेती उपयोगी साहित्य चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक गठित करण्यात आले.


मेहकर, लोणार, जानेफळ, डोणगाव आदी पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या स्प्रिंकलर तोट्या चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, २ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी महादेव किसन मोहरुत (वय २५, रा. धार, ता. मेहकर) यांनी पोलीस स्टेशन जानेफळ येथे तक्रार दिली होती की, त्यांच्या शेतातून अज्ञात आरोपींनी १४१ नग तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्या (किंमत अंदाजे ४२,३०० रुपये) चोरीस नेल्या. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.


गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत २२ जानेवारी २०२६ रोजी या चोरी प्रकरणांची यशस्वी उकल केली. या कारवाईत देवराज युवराज पवार (वय २२) व उमेश राजू पवार (वय २५, दोन्ही रा. मोहना खुर्द, ता. मेहकर) या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ८० हजार रुपयांच्या तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्या जप्त करण्यात आल्या आहेत.


अटक आरोपी सध्या जानेफळ पोलीस यांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबुलकर, पोउपनि प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, पोको. निलेश राजपूत, राजेंद्र गडकर, विकास देशमुख तसेच पोलीस स्टेशन जानेफळचे सपोनि अजिनाथ मोरे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!