Advertisement Advertisement

सिंदखेड राजा हादरले; नाशिकच्या सारुळ जंगलात शहरातील १७ वर्षीय तरुणीची हत्या….

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सिंदखेड राजा शहरातील १७ वर्षीय तरुणीची नाशिक येथील सारुळ जंगल परिसरात निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही वैद्यकीय शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी अकोला येथील एका खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेत होती व तेथेच हॉस्टेलमध्ये राहत होती. १९ फेब्रुवारीपासून ती अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने अखेर अकोला पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.


दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी नाशिक येथील सारुळ जंगल परिसरात एका अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला. नंतर ओळख पटविण्यात आली असता, मृतदेह हा सिंदखेड राजा येथील बेपत्ता तरुणीचाच असल्याचे निष्पन्न झाले.


घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी नाशिक येथे धाव घेतली. तेथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सिंदखेड राजा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणाची प्राथमिक नोंद अकोला येथे करण्यात आली असली, तरी घटना नाशिक परिसरात घडल्यामुळे अकोला व नाशिक पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. या हत्येमागील नेमके कारण, आरोपींची संख्या व त्यांची ओळख याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


या घटनेमुळे सिंदखेड राजा शहरात हळहळ व्यक्त केली जात असून महिला व तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!