बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रेशन दुकानांमधून गोरगरिबांना निकृष्ट, बोगस, किडे लागलेले व उंदरांच्या लेंड्यांनी भरलेले ज्वारी-तांदूळ वाटप केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारी करूनही प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्याने अखेर युवासेनेने थेट रस्त्यावर उतरत अनोखं आंदोलन केलं.
युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर व विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओम गायकवाड यांनी याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सत्य परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. मात्र, तक्रारीनंतरही पुन्हा त्याच निकृष्ट धान्याचं वाटप करण्यात आलं. प्रशासनाचा हा बेशरमपणा सहन न झाल्याने ५ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जोरदार आंदोलन छेडण्यात आलं.
आंदोलक थेट कार्यालयात निकृष्ट तांदळाचा भात, ज्वारीची भाकर व ठेचा घेऊन पोहोचले.
“आम्हा गोरगरिबांना हेच धान्य खायला देता; आम्ही खातोच, पण तुम्ही सुद्धा खा!” असा ठाम सवाल करत आंदोलकांनी कार्यालयात ठाण मांडलं.
दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाच्या जबाबदारीवरील डॉ. जयश्री ठाकरे यांनी आंदोलकांना सामोरं जाण्याऐवजी दुसऱ्या कार्यालयात बसणं पसंत केल्याने संताप आणखी वाढला. सायंकाळी ७ वाजेपर्यंतही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून न घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.
अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर डॉ. ठाकरे कार्यालयात आल्या. आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत संबंधित तहसीलदारांना तातडीचे निर्देश देण्यात आले.
“यापुढे निकृष्ट व बोगस धान्य येऊ दिलं जाणार नाही. लेखी उत्तर दिलं जाईल व दोषी पुरवठादारावर कठोर कारवाई केली जाईल,” असं लेखी आश्वासन त्यांनी दिलं.
या आंदोलनामुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून, गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.














