Advertisement Advertisement

ग्रामीण विद्यार्थ्यांची टेक्नॉलॉजीत दमदार एंट्री; आदित्य-अनुष्काचा झंझावात….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय CS Hackathon स्पर्धेत चिखली तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा, वरखेड येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या अभिमानास्पद यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इयत्ता आठवीतील आदित्य मुंढे व अनुष्का अंभोरे या विद्यार्थ्यांनी कोडिंगवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करत परीक्षकांना अक्षरशः प्रभावित केले. त्यांच्या कल्पकतेसोबतच तांत्रिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेदरम्यान बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. खरात यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामीण भागातील विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व त्यांचे अभिनंदन केले.

या यशाबद्दल शाळेला ५ एचपी लॅपटॉप व कॉम्प्युटर किट देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे वर्गशिक्षक शुभम बुरकुल, मुख्याध्यापक शरद बंगाळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भगत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोडिंगच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी मांडणी करत जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता दाखवून दिली आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत वरखेड, सरपंच, सदस्य, पालक व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!