बुलढाणा( बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यात आयुष मंत्रालय (Ministry of AYUSH) अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुमारे ७० रुग्णालयांच्या इमारती पूर्ण असूनही निधीअभावी, रिक्त पदे आणि औषधांच्या कमतरतेमुळे ही रुग्णालये प्रत्यक्षात कार्यरत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रपतींनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यात उभारलेली आयुष रुग्णालये केवळ इमारतीपुरती मर्यादित राहिली आहेत. डॉक्टर, कर्मचारी आणि आवश्यक सुविधा नसल्याने ही रुग्णालये ‘व्हेंटिलेटरवर’ असल्यासारखी स्थिती आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांना अपेक्षित आरोग्यसेवा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, ही समस्या केवळ बुलढाण्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अशीच परिस्थिती आहे. राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी राष्ट्रपती ज्या तालुक्याला भेट देणार आहेत, त्या भागातील रेशनमधून वितरित कथित दूषित धान्यामुळे नागरिकांमध्ये केसगळती आणि नखगळती झाल्याच्या प्रकाराकडेही लक्ष वेधले. या घटनेला वर्ष उलटूनही चौकशीचा अहवाल जाहीर झालेला नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असून दबावामुळे अहवाल दडपला गेला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
तसेच, राष्ट्रपतींच्या भेटीनंतर तरी आयुष रुग्णालये सुरू करण्यात यावीत, दूषित धान्य प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि नागरिकांना सुरक्षित अन्नपुरवठा सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गतही अनियमितता होत असल्याचा आरोप करत, केवळ घोषणांवर न थांबता योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. कुपोषण आणि आरोग्याच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करून जनतेला दिलासा देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.














